मोठी घोषणा! ‘लाडकी बहीण’नंतर ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना; विद्यार्थिनींना दरमहा किती मिळणार?

पुणे : महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, पात्र महिलांना दरमहा ठरावीक आर्थिक मदत दिली जाते.

राज्यभरातील जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. या योजनेमुळे ‘लाडक्या बहिणींचा मोठा पाठिंबा महायुतीला मिळाला आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीतही दिसून आला.
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला मिळालेल्या यशानंतर त्याच धर्तीवर उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील शालेय विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

महापालिकेकडून ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’ जाहीर करण्यात आली असून, इयत्ता ७ वी ते १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलत ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ७ वी ते १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपये देण्यात येणार आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच ही रक्कम थेट संबंधित विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
विद्यार्थिनींच्या शिक्षणातील गळती रोखणे आणि त्यांच्या शैक्षणिक खर्चाला हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ७ वी ते १२ वीमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीद्वारे विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अपूर्ण राहणाऱ्या मुलींसाठी ही योजना मोठा आधार ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वर्गीय ज्योती पप्पू कलानी यांच्या नावाने ही योजना राबवली जाणार आहे. दरमहा मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे गोरगरीब कुटुंबांतील मुलींच्या शिक्षणाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.