तब्बल चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपली, पुणे झेडपीला मिळाले नवे कारभारी, दौंडच्या पारड्यात झुकते माप…


पुणे : तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (दि. १८ मार्च) पुणे जिल्हा परिषदेला अखेर नवे ‘कारभारी’ मिळाले. दौंडचे विरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर आंबेगावचे विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीमुळे गेल्या सुमारे चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर सुरू असलेले प्रशासकीय राज अखेर संपुष्टात आले असून, आता पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार येणार आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरधवल जगदाळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एकूण तीन अर्जांमध्ये जगदाळे यांचे दोन, तर शिंदे यांचा एक अर्ज होता.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य करण खलाटे, विक्रम खुटवड, शांताराम इंगवले, अमोल नलावडे आदींनी विजयसिंह शिंदे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे विरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.

उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक वळसे-पाटील यांचे दोन आणि शिवसेनेचे (शिंदे गट) मंगेश काकडे यांनी एक असे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या विनंतीनंतर मंगेश काकडे यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आणि विवेक वळसे पाटील हे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले ‌

जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष विरधवल जगदाळे हे दौंड तालुक्यातील खडकी जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. त्यांची जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी त्यांनी दौंड नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. याशिवाय दौंड शुगर या साखर कारखान्याचे ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!