मोठी बातमी! अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची पोटनिवडणुक कोण लढणार, बैठकीत झाला अंतिम निर्णय…

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

या विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून १ जानेवारी २०२६पर्यंत नाव नोंदविलेले मतदार पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. या मतदारसंघासाठी १० मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी १० मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.
आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
तसेच २६ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारी विषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.