दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा, काय काय घडणार?

पुणे :राज्यातील 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी रोजी मतदान केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षा असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा आज होणार आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीच्या घोषणापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच एकत्र औक्षण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
युतीची घोषणा करण्यासाठी वरळी सी फेस येथील हॉटेल ब्ल्यु सी या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती. आज त्याच जागी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, पुणे, नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही रणनीती आखली आहे. आज केवळ युतीची घोषणा होणार असून जागावाटपाचा सविस्तर आराखडा नंतर जाहीर केला जाईल, अशी माहिती मिळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर यांसह ठिकठिकाणी ठाकरे बंधूंची युती होणार आहे.

या ऐतिहासिक युतीमुळे राज्यातील राजकारणाची संपूर्ण समीकरणे बदलणार आहे. विशेषतः मुंबई आणि ठाणे पट्ट्यात विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सत्ताधारी पक्षांनी या युतीवर नौटंकी अशी टीका केली असली, तरी ठाकरे बंधूंनी मात्र शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँडची ही जादू किती चालणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

