कर्नाटकमधला दशरथ मांझी ! २८ हजार तास, ८ वर्ष, पण पठ्ठ्याने पाणीच आणले, सरकारने केला पद्मश्रीने सन्मान …!
दिल्ली : एखाद्याच्या मनात आलं की ती गोष्ट अशक्य नसतेच. आता दक्षिण कर्नाटकातील अद्यानाडका हे गाव. या गावात महाबली भट यांच्याकडे २२ वर्षांचे असताना नाईक हे मजूरी करीत होते. भट यांच्याकडे नारळी व सुपारीच्या बागा होत्या. मात्र त्यांच्या मनात काही वेगळेच होते.
भट यांनी त्यांची शेतातील आवड व शेतीवरील त्यांचे अतोनात प्रेम पाहून त्यांना टेकडीवरील शेती दिली. नाईक यांचे स्वप्न होते, त्या टेकडीला हिरवेगार करण्याचे. तेथे नारळी, पोफळीच्या बागा साकारण्याचे. मग नाईक यांनी हार मानली नाही. ते लढत राहीले.
सुरवातीला टेकडीच्या पायथ्याला झोपडी बांधली. पाणी साठविण्यासाठी बोगदे स्वतःच खोदायला सुरवात केली. एक नव्हे, दोन नव्हे सहा बोगदे खोदले. पाच बोगदे खोदता खोदता ढासळले. मात्र नाईक थांबले नाहीत.
सहावा बोगदा ३८ फूट खोल खोदला आणि मग मात्र पाणी लागले. या साऱ्या कष्टाचा प्रवास करायला त्यांना आठ वर्षे व २३ हजार तास लागले.
आज त्याच नाईकांची शेती हिरवीगार आहे. ३०० सुपारीची, ८० नारळाची, १५० काजूची झाडे, तेवढीच केळीची झाडे त्यांच्या या शेतीत आहेत. त्यांच्या शेतात पाण्याच्या एका थेंबाचीही किंमत केली जाते. पाणी अजिबात वाया घालवले जात नाही.
भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामुळे एखाद्याच्या मनात जिद्द असेल तर काहीही करू शकतो. हे यावरून दिसून येते.