जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास घर, पाणीकर होणार माफ, शाळा टिकवण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतला निर्णय…

बुलडाणा : तालुक्यातील भडगावात जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा सुरू आहे. पहिली ते सातवीपर्यंत मराठी माध्यम सुरळीत सुरू होते. त्यातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आली आहे. यामुळे सगळेच चिंतेत होते.
याठिकाणी शाळेत विद्यार्थी मिळणे देखील कठीण झाले. असे असताना जिल्हा परिषदेची शाळा कायम सुरू राहावी यासाठी भडगाव ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. शाळा वाचविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी आणि पाणी कर माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
आज खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच इंग्लिश मिडीयम शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. खासगी शाळांमध्ये असलेल्या सुविधा यामुळे पालक वर्ग पाल्यांना जिल्हा परिषद शाळांऐवजी खासगी शाळेत टाकत असतो.
यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या कमी होत आहे. अशाच प्रकारे भडगाव येथील शाळेत पहिली ते चौथी या वर्गात मिळून केवळ २९ विद्यार्थीसंख्या आहे. यामुळे घटती संख्या पाहता, याबाबत ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. दरम्यान, स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे आता अवघड झाले आहे.