पुण्यातील तब्बल 152 महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार ; काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्याच्या महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्यावर आता जमीन नोंदींमध्ये फेरफार केल्याप्रकरणी मोठी कारवाई होणार आहे. 152 अधिकाऱ्यांच्यावर टांगती तलवार असून कलम 155 चा गैरवापर केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लवकरच त्यांचे निलंबन आणि विभागीय चौकशी होणार आहे. त्यामुळे पुण्याच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात जमीन नोंदीमध्ये फेरफार केल्याच्या गंभीर प्रकरणात आता प्रशासनाने चौकशीचा वेग वाढवला आहे. त्यानुसार पुण्यातील तब्बल 152 अधिकाऱ्यांना कारवाईला समोर जावं लागणार आहे. विशेष म्हणजे मंत्रालय स्तरावर या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यामध्ये तत्कालीन तहसीलदार,नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य सरकारने नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने गेल्या पाच वर्षांतील प्रकरणांची सखोल तपासणी करून आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. यात काही प्रकरणांत संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकाराच्या मर्यादबाहेर जाऊन जमीन नोंदीत फेरफार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये पुण्यातील 152 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

समितीने केलेल्या या चौकशीत मालकी हक्क, वारस नोंदी आणि क्षेत्रफळ बदलाशी संबंधित प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे यामध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जमीन नोंदीशी संबंधित पारदर्शकता आणि विश्वासार्हता यावर या घडामोडींचा थेट परिणाम होणार असून भविष्यात अशा प्रकाराना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.