राष्ट्रवादीकडून बंडखोरांवर कारवाईस सुरुवात; दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका वर्षामध्ये दुसऱ्यांदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९आमदारांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या आमदारांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादीने पहिले पाऊल उचलले आहे. या ९ जणांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असं पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले आहे.
एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांवर कारवाईला सुरूवात झाली असतानाच राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून शरद पवार यांना पत्र पाठवलं आहे. सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असं सुप्रिया सुळे यांनी या पत्रात नमुद केलं आहे.
सुप्रिया सुळे यांच्या या पत्रानंतर शरद पवारांनी लगेचच तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे, असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे.