हॉटेलच्या शौचालयाच्या खिडकीतून आरोपी फरार; लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने पुन्हा अटक..

लोणी काळभोर : अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी शौचाचा बहाणा करून हॉटेल मधील शौचालयाची काच फोडून पळून गेल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात रात्रीच्या सुमारांस घडली होती. या आरोपीस माळशिरस पोलिसांनी लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने पुन्हा जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशिरस (सोलापूर जिल्हा) येथील अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी माळशिरस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गणेश बाळु ऊर्फ बाळासाहेब जाधव (वय २०, रा. जाधववाडी, ता. माळशिरस, जि. सोलापुर) याला २ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
जाधव याला अटक केले नंतर त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, माळशिरस यांच्यासमक्ष हजर केले होते. न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. अल्पवयीन मुलीकडे केलेल्या चौकशी दरम्यान व आरोपीकडे केलेल्या तपासात जाधव व अल्पवयीन मुलगी आळंदी देवाची (पुणे) येथील दर्शन मंडपामध्ये १० जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत राहिले असल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्ह्याच्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी माळशिरस पोलिसांचे पथक शासकीय वाहनाने ४ ऑगस्ट रोजी सकाळी आळंदीकडे जाण्याकरीता रवाना झाले होते.
तपास झालेनंतर सोमवार (४ ऑगस्ट) रोजी माळशिरस पोलिसांचे पथक माघारी निघाले होते. ते पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील माळीमळा परिसरात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आले असता बाळु जाधव याने शौचास जायचे आहे असे सांगितले. म्हणून पोलिसांनी गाडी महामार्गालगत असलेल्या हॉटेल शौर्यवाडा समोर थांबवली येथील टॉयलेटमध्ये घेऊन गेले. हा मोका साधून जाधव याने टॉयलेटच्या आत मधील खिडीकीची काच फोडुन खिडकीवाटे बाहेर पडून पोलीस रखवालीतुन पलायन केले.
काही वेळाने सदर बाब लक्षात येताच पोलीस हवालदार सचिन भोसले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले. आणि आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. माळशिरस पोलीस व लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीचा सुगावा लावून मोठ्या शिताफीने अटक केली.