छत्रपतीचा एकच नारा! वजन चोख अन् पैसे रोख, गाळप हंगामाची जोरदार तयारी, कारखान्याचा नवा अध्याय सुरू…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या एका नव्या पर्वाला सुरूवात करत आहे. कारखान्याची सूत्र पृथ्वीराज जाचक यांच्याकडे गेल्यापासून अनेक बदल सध्या केले जात असून सभासद देखील मोठा प्रतिसाद देत आहेत. आता पृथ्वीराज जाचक यांनी एक नवीन नारा दिला आहे. वजन चोख अन् पैसे रोख असा हा नारा आहे.

कारखाना मोठा अडचणीत असला तरी मोठ्या शर्तीने सध्या जाचक आणि त्यांची टीम काम करत असून हा हंगाम कारखान्यासाठी मोठं आव्हान आहे. सध्या गाळपाची तयारी पूर्ण झाली असून पूर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी आपल्या कारखान्यालाच ऊस घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कारखान्याच्या वजन काट्यावर कधीही वजन करा, आपलं वजन अचूकच येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात कारखाना मोठ्या अडचणीत गेला असून सभासदांनी यावेळी पृथ्वीराज जाचक यांच्याकडे सत्ता देऊन आशा निर्माण केली आहे. जाचक यांनी देखील लगेच कामाला सुरुवात करत अनेक बदल घडवले आहेत. आता कारखाना सुरु होत असून सभासदांनी ऊस आपल्याच कारखान्याला घालावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुढील काही दिवस सहकार्य करा कारखाना अडचणीतून बाहेर काढणारच असा शब्द जाचक यांनी दिल्याने शेतकऱ्यांवर आता मोठी जबाबदारी आहे. यासाठी माझा कारखाना माझी जबाबदारी, वजन चोख पैसे रोख असा नारा, दिला जात आहे. याला कामगार आणि सभासद देखील प्रतिसाद देत आहेत.
कारखाना जास्तीक जास्त गाळप करून लवकरच संकटातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळ काम करत असून कामगारांना देखील वाढीव पगार, उसाला अनुदान असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे येणारे दिवस छत्रपतीसाठी महत्वाचे असणार आहेत.
