Accident News : पुन्हा एकदा भीषण अपघात! लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, सहा जणांचा जागीच मृत्यू..
Accident News : नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये क्वॉलीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अजय दशरथ चिखले (वय. ४५), विठ्ठल दिगंबर थोटे (वय. ४५), सुधाकर रामचंद्र मानकर (वय.४२), रमेश ओंकार हेलोंडे (वय.४८), मयूर मोरेश्वर इंगळे (वय.२६) वैभव साहेबराव चिखले (वय. ३२) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, एका क्वॉलीस कारमधून सात जण नागपूरहून काटोलच्या दिशेनं प्रवास करत होते. नागपुरात एका लग्नाही हे सातही जण उपस्थित राहण्यासाठी आले होते. रात्री उशीरा नागपुरातील लग्नाचा कार्यक्रम आटपून सातहीजण आपल्या घरी निघाले होते.
पण रस्त्यातच त्यांच्यावर काळानं घाला घातला. नागपूरहून काटोलच्या दिशेनं जात असताना समोरून येणाऱ्या एका ट्रकनं क्वॉलीस गाडीला धडक दिली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. Accident News
दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.