Accident News : पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रालीला बसची जोरदार धडक, अन् नंतर दुचाकीस्वाराला..

Accident News : सध्या अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक अपघाताची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नंबर १ च्या हद्दीत गुरुवारी (ता. २३) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रालीला एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकासह सेवा रस्त्याने जाणाऱ्या तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातास बसचालक विनायक सोपान गायकवाड (वय ४५ वर्षे, रा. काझी करबस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याला कारणीभूत ठरवून, त्याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात निलेश रामदास कोळी (वय ३३, रा. डाळज नं. १, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे .Accident News
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बसचालक त्याच्या ताब्यातील एसटी बस (क्र. एम.एच १३/सी यु/८१२५) पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने घेऊन जात होता. त्यावेळी पुणे सोलापूर रस्त्याने भिगवणकडून इंदापूरच्या दिशेने चाललेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने चालक आबा करे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तसेच त्यानंतर एसटी बस ही पुणे ते सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पुणे सेवा रस्त्यावर खाली येऊन पल्सर मोटारसायकलवरून (क्र. एम. एच. ४२ बी. एच. ९७९७ ) डाळजकडे निघालेले रवींद्र रावसाहेब जगताप यांना धडक दिली.
दरम्यान, त्यानंतर एसटी बस उलटली व त्याखाली ते चिरडले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.