वैष्णवी मृत्यू प्रकरणी फरार हगवणे पिता-पुत्राला अटक, दोघंही ७ दिवसांपासून होते फरार..

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. या खळबळजनक प्रकरणातील फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी अटक केली. हे दोघे गेल्या सात दिवसांपासून फरार होते.

बावधन परिसरातून आज पहाटे ४.३० वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले. वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. तिच्या मृत्यूनंतर लगेचच पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती.
मात्र, सासरे आणि दीर हे सातत्याने पोलीस तपासापासून दूर राहात होते. त्यांच्या अटकेसाठी सहा स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. अखेर आज पहाटे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, लवकरच अधिकृत खुलासा करण्यात येणार आहे.

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय.२३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी याआधीच अटक करण्यात आली होती.
सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या७ दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.