लोणी काळभोरमध्ये टोळक्याकडून तरुणाला धारदार शस्त्रांसह चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण; 15 जणांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर: लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील श्री अंबरनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यावर एका टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे भांडणे मिटवण्याचा बहाणा करून एका टोळक्याने दगड, लोखंडी हत्यार व चामड्याच्या पट्ट्याने तरुणाला मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 22) दुपारच्या सुमारास घडली.. या मारहाणीत तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 10 ते 15 जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पोपट काळभोर (वय 22, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर ता.हवेली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शंतनु धुमाळ, तेजस काळभोर, शुभम विरकर, साहिल कोल्हे व इतर 10 ते 15 अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम काळभोर यांच्या घराजवळ राहणारा मित्र ओंकार सुनिल काळभोर व अशोक राजेंद्र काळभोर यांची साहिल कोल्हे याच्यासोबत लोणी काळभोर येथील एका महाविद्यालयात शुक्रवारी (ता.22) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वाद विवाद झाले होते. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शुभम काळभोर यांच्या ओळखीचा तरुण तेजस काळभोर याचा फोन आला व त्याने सांगितले की, तुमच्या सिद्राममळा येथील मुलांनी माझा मित्र साहिल कोल्हे याच्यासोबत वाद विवाद करुन त्याला मारहाण केली आहे. पुढे काही कमी जास्त झाल्यास आम्हाला बोलु नको, असे सांगितले. त्यावर फिर्यादी शुभम काळभोर म्हणाला, माझा याच्याशी का हीएक संबंध नाही, तुमचं तुम्ही बघा असे म्हणून फोन ठेवून दिला. यादरम्यान शुक्रवारी शंतनु धुमाळ हा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शुभम काळभोर याच्या घराजवळ आला व म्हणाला की, ओंकार व अशोक काळभोर यांची घर कुठे आहेत अशी विचारपूस केली. त्यावर शुभमने मला माहित नाही असं म्हटलं. तेव्हा शंतनु शुभमला आपण वाद मिटवून घेऊ असं म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील श्री अंबरनाथ मंदिराच्या असलेल्या कुस्ती आखाड्यालगच्या रस्त्यावर घेऊन आला.
त्यानंतर आरोपी शुभम विरकर यांने कमरेच्या चामडी पट्टा काढून शुभम काळभोर यांच्या हातावर, पाठीवर, मानेवर मारहाण केली.या मारहाणीत शुभम काळभोर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी शुभम काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351 (2)(3),189(1), 189(2). 189 (4) 191(3) महाराष्ट्र पोलीस अधि. कलम 37 (1) (2) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.