शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्याकडून तरुणाला जबर मारहाण, काळंनिळं होईपर्यंत मारलं!

पुणे : शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी पार्टीत गाणं लावण्याच्या वादातून युवकावर प्राण घातक हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्या युवकाला त्यांनी जबर मारहाण केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, करण जाधव असं त्या युवकाचे नाव आहे. त्याला शिंदे गटाच्या साथीदारांनी हातोडा, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली.या घटनेत करण जाधव गंभीर जखमी असून त्याच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर, हैप्पी भुल्लर, सनी भुल्लर, मुकेश यादव, सचिन शेवाळे, मणि अण्णा, रमु आणि डॅनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गटारी अमावस्येच्यानिमित्त करण जाधव आपल्या मित्रांसह आदित्य फार्महाऊसवर पार्टीसाठी गेला होता. रात्रीच्या सुमारास गाणं लावण्यावरून करण आणि दुसऱ्या गटात वाद झाला. वाद बघून फार्महाऊस मालकाने दोन्ही गटांना बाहेर जाण्यास सांगितले. याच दरम्यान उल्हासनगरातील शिंदे गटाचा युवा सेना पदाधिकारी विकी भुल्लर आपल्या साथिदारांसह फार्महाऊसवर दाखल झाला. त्यांच्या शाब्दिक वाद झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी करणला जबर मारहाण केली..या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असला तरी, घटनेनंतर 48 तास उलटून गेले तरीही एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
जखमी करण जाधवने पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.