पुण्यात गुन्हेगारीचा थरार! स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा तरुण मावस बहिणीसोबत नदीपात्रात गेला; दुचाकीस्वारानं अडवलं अन् घडलं भयंकर…


पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अभ्यासासाठी आलेल्या एका तरुणासोबत धक्कादायक घटना घडली. हा तरुण आपल्या मावस बहिणीसोबत जात असताना दोन जणांनी त्यांना अडवलं.

यानंतर आरोपींनी कोयता दाखवत धमकावलं आणि त्यांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

.निखिल संदीप जाधव (वय २०, रा. जनता वसाहत) आणि ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. महात्मा फुले पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, शुक्रवारी (१० एप्रिल २०२६) सायंकाळी सुमारे ५ वाजता तो आपल्या मावस बहिणीसह नदीपात्रातील रस्त्यावरून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवलं.

आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली आणि तरुणाला धमकावत त्याच्याकडील पैसे जबरदस्तीने हिसकावून घेतले. या घटनेमुळे बहीण-भाऊ दोघेही प्रचंड घाबरले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.

या घटनेनंतर तरुणाने तातडीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नदीपात्र परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपींनी अशाच प्रकारे आणखी कोणाला लुटले आहे का, याचा तपास आता डेक्कन पोलीस करत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!