आठ दिवसांपासून साताऱ्यातील तरुण बेपत्ता; पुण्यातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ, नेमकं काय घडलं?

पुणे : सातारा जिल्ह्यातील वाई येथून आठ दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय तरुणाचा पुण्यात मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातील गजबजलेल्या कॅम्प (लष्कर) परिसरातील एका लॉजमध्ये या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे उघडकीस आले आहे. पीयूष ओसवाल (रा. वाई, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे ओसवाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना कॅम्प परिसरातील ‘मुकेश लॉज’मध्ये उघडकीस आली. बुधवारी दुपारी लॉजमधील एका बंद खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीचा दरवाजा ठोठावून आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लॉज प्रशासनाने तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, पीयूष ओसवाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, मृतदेहाची अवस्था आणि खोलीत पसरलेली दुर्गंधी पाहता, पीयूषने सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
