नाशिकच्या तरुणाला गोड बोलून नेलं अन् जिवानिशी संपवलं, पत्नी अन् प्रियकरच निघाले मारेकरी, अखेर गूढ समोर…

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील परसूल शिवारात २२ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळला होता.आता अखेर १५ दिवसानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे.

हा मृतदेह निफाड तालुक्यातील उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी (३०) याचा होता. त्याची कुणीतरी निर्घृण हत्या करून मृतदेह नदीत टाकल्याचा पोलिसांना संशय होता. हा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर त्याच्याच पत्नीने केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.
आरोपी पत्नीने प्रियकर आणि तिच्या भावाच्या मदतीने हा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ज्या पत्नीने पती बेपत्ता असल्याचं भासवलं, तिच खुनी निघाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

मृत शादाब तांबोळी हा १८ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. २२ फेब्रुवारी रोजी परसूल-चिंचोली नदीतील पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तपासाअंती हे पार्थिव शादाबचे असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि शादाबच्या गेल्या एक वर्षाच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला असता, संशयाची सुई त्याची पत्नी मुस्कान शादाब तांबोळी हिच्याकडे वळली.
तसेच मुस्कानचे मनमाड येथील ऋषभ मनोज वर्मा (२३) याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पती शादाब अडथळा ठरत असल्याने मुस्कानने त्याला कायमचे वाटेतून हटवण्याचा कट रचला. यात तिने आपला भाऊ शाहरूख शेख आणि त्याच्या मित्रांची मदत घेतली.
संशयितांनी शादाबला संपवण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध योजना आखली होती. सोन्याच्या दागिन्यांचा मोठा व्यवहार करायचा आहे, असं आमिष दाखवून त्याला मनमाड-मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर नेण्यात आले. तिथे शादाबची निर्घृण हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याच्या हातापायाला लोखंडी डंबेल्स बांधून मृतदेह परसूल शिवारातील नदीत फेकून दिला.
दरम्यान. शादाब बेपत्ता झाल्यापासून उगाव परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्याच्या मित्रपरिवाराने आणि गावकऱ्यांनी ‘शादाबचा शोध घ्या’ अशी मोहीम सोशल मीडियावर राबवली होती. इतकेच नाही, तर न्याय मिळावा यासाठी १५ दिवस स्थानिक पातळीवर मोर्चेही काढण्यात आले होते. या सर्व काळात मुस्कानने केवळ बनाव केला होता, मात्र पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तिचं बिंग फुटलं.