पाटस-दौंड रोडवर अपघातात तरुणाचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांनी पेटवली कार..
दौंड : दौंड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर बिरोबावाडी जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी कार पेटवून दिली आहे. नेहल गावडे हा बिरोबावाडी येथील ग्रामदैवत श्री. बिरोबा देवाचे दर्शन घेऊन पाटस दौंड रस्त्यावरून दुचाकीवर पाटस बाजूकडे घरी जात होता.
यावेळी पाटस ते दौंड अष्टविनायक रस्त्यावरुन पाटस बाजूकडून दौंडकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक नेहल गावडे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी काही संतप्त ग्रामस्थांनी ही कार पेटवून दिली. यामुळे पाटस- दौंड रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. या आगीत ही कार जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या मार्गावरून प्रवास करताना वाहनांचा अतिवेग हा जीवघेणा ठरत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. यामुळे अनेकांचे जीव यामध्ये जात आहेत.