नवरा मेला मग तुझं….!! रानात सरपण गोळा करणाऱ्या विधवेचा विनयभंग, धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला

रायगड : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

रायगडमध्येच महिलांची सुरक्षा असुरक्षित असल्याचे भयावह चित्र रोहा तालुक्यातील एका संतापजनक घटनेतून स्पष्ट झाले आहे. रोहा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रोहा तालुक्यातील एका गावालगत असलेल्या बेलवाडी शेजारील रानात ही घटना घडली.
घरगुती वापरासाठी जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या एका विधवा महिलेचा त्याच गावातील एका इसमाने एकटी असल्याची संधी साधून विनयभंग केला. पीडित महिला रानात लाकडी फाटे गोळा करत असताना आरोपी तिच्या जवळ आला. त्याने अचानक तिचा हात पकडून ‘तुझा नवरा मेला आहे, मग तुझं कसं काय?’, असे म्हणत महिलेला जबरदस्तीने जवळ ओढून तिच्या स्त्रीसन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचवणारे कृत्य केले. या घटनेमुळे महिला प्रचंड घाबरून गेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत रोहा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

दरम्यान, त्यानुसार गुन्हा क्रमांक १७/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील या करीत आहेत.
