कदमवाकवस्तीत झळकली इराणच्या राष्ट्राध्यक्षाचा समर्थनात स्वागत कमान! लोणी काळभोर पोलिस संबधितांवर कारवाई कधी करणार; नागरीकांचा संताप..

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत चक्क इराणचा राष्ट्रीय ध्वज आणि राज्याध्यक्ष अली खामेनी यांचे फ्लेक्स लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देवून फ्लेक्स हटवण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर फ्लेक्स पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन भागामध्ये असलेल्या हॉटेल प्यासा नजीक असलेल्या इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लागले होते. त्यांवर इराणचा राष्ट्रीय ध्वज आणि राज्याध्यक्ष अली खोमोनी यांचे चित्र होते. हा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.
इराणी झेंडे व फ्लेक्स लागल्याने लोणी काळभोरसह परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या व त्यांनी लोणी काळभोर पोलीसकडे कारवाईची मागणी केली. यासंदर्भात स्थानिक नागरिकांकडूनही निषेध व्यक्त करण्यात आला.
सदर प्रकार लक्षात येताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश खांडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार रामहरी वणवे, रवी आहेर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या मदतीने हे सर्व फ्लेक्स हटवण्यात आले आहे.