धक्कादायक! कपड्याच्या दुकानाला भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याने दुकानाच्या वरील मजल्यावर राहणाऱ्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरातुन समोर आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
आसिम वसीम शेख (वय-३), परी वसीम शेख (वय- २), वसीम शेख (वय-३०), तन्वीर वसीम (वय- २३), हमीदा बेगम (वय-५०), शेख सोहेल (वय- ३५), रेश्मा शेख (वय -२२) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीला अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सातजण मृत्युमुखी पडल्याची माहिती सोमर येत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सातजणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.