घरात एकट्या असलेल्या कॉलेज तरुणीसोबत भयंकर कृत्य, वडिलांनी दार उघडलं, आतलं दृश्य बघून सगळेच हादरले..

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथं एका १७ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीची अज्ञात आरोपीने घरात घुसून गळा चिरून निर्घृण हत्या केली.

तसेच या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांच्या निर्दयीपणाने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवी संतोष नीळ (वय १७) असं मृत तरुणीचं नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वैष्णवी ही वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कॉलेजमधून घरी परतली होती.

यावेळी तिचे वडील संतोष नीळ हे दहेगाव-बिडकीन मार्गावरील आपल्या पानटपरीवर गेले होते आणि आई शेतात काम करत होती. तर भाऊ शाळेत गेला होता. घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात हल्लेखोराने घरात प्रवेश केला आणि वैष्णवीचा गळा चिरून तिची हत्या केली.
दुपारच्या सुमारास वैष्णवीचे वडील संतोष नीळ काही कामानिमित्त घरी आले. तेव्हा घरात वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली. सुरुवातीला त्यांना ती रक्ताच्या उलट्या करत असल्याचं वाटलं, त्यामुळे त्यांनी तातडीने पत्नी मथुरा यांना फोन करून बोलावून घेतले.
मात्र, जेव्हा आई आणि इतर नातेवाईक घरी पोहोचले आणि त्यांनी वैष्णवीला जवळ पाहिले, तेव्हा तिच्या गळ्यावर खोल जखम असल्याचं आणि तिचा गळा चिरल्याचे स्पष्ट झाले. तिला ओसरीत आणले असता तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात आले आहे.
दरम्यान,, घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
