पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात; अपघातात दोघे ठार, चार जण गंभीर

पुणे : पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीने ५ ते ६ गाड्यांना जोरदार धडकेमुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.
या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले.
कोंढवा पोलिसांनी बसचालक आरोपी मैनुद्दीन मेहबूब शेख (वय ४२, रा. नाना पेठ, कॅम्प चौक, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. ही मिनी बस द टाइम ट्रॅव्हल कंपनीच्या मालकीची आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर ऑर्किड पॅलेससमोरील उतारावर वाय जंक्शनजवळ बसचा (क्रमांक एमएच १२- एचबी ०२४२) ब्रेक फेल झाला. त्यामुळे ही बस उतारावरून भरधाव सुटली.
बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली, त्यात एका वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य चारजण गंभीर असून, त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.