सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! ५०० रुपयांच्या वादातून लहान भावाचा केला खून, घटनेने खळबळ..

कल्याण : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पाचशे रुपयांसाठी सख्ख्या भावाचा खून केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कल्याण पश्चिम परिसरातील रोहिदासवाडा येथील आहे.
रात्री झोपल्यावर भावाने खिशातील पाचशे रुपये काढून घेतले, या संशयातून आरोपीनं भावावर घरातील भाजी कापायच्या चाकूने वार केले आहेत. याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सलीम शमीम खान असं आरोपी भावाचं नाव आहे. तर नईम शमीम खान असं मृत पावलेल्या भावाचं नाव आहे.
नेमकं घडलं काय?
मंगळवारी रात्री झोपताना सलीमच्या खिशातून ५०० रुपये गायब झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर खिशात पैसे नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने खिशातील पैसे कुणी घेतले, अशी घरात विचारणा केली. पण पैसे कुठे गेले, कुणालाच माहीत नव्हतं.
पण आपला लहान भाऊ नईम यानेच पैसे घेतले असावेत, असा संशय सलीमला होता. यातून त्याने नईमला जाब विचारला. यातून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. ५०० रुपयांवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की आरोपी मोठा भाऊ सलीम रक्ताचं नातं विसरला.
दरम्यान, त्याने घरातील चाकूने सख्ख्या भावावर सपासप वार केले. भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला. भावाची हत्या केल्यानंतर सलीम घरातून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हत्येसह विविध कलमांतर्गत सलीमवर गुन्हा दाखल केला आणि अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.