पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे, राजगड उतरताना डोक्यात दगड पडला, १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू…

पुणे : किल्ले राजगडावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. मात्र, येथेच पुण्यातील एका तरुणासोबत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. राजगड किल्ला पाहायला गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड पडल्याने मृत्यू झाला.
पुण्यात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा किल्ले राजगडावर बुरुजाचा दगड डोक्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. गडावरील पाली या दरवाज्याजवळ गड उतरत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.
अनिल विठ्ठल आवटे (वय. १८) असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा खादगाव भाबट (ता. सेलू, जि. परभणी) येथील राहणारा असल्याची माहिती आहे.
सविस्तर माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनानिमित रविवारी किल्ले राजगड या किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यावेळी अनिल आवटे हा देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आला होता. अनिल हा पुण्यातील धायरी परिसरात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी खाजगी क्लासेसमध्ये अभ्यास करत होता.
दरम्यान, यावेळी किल्ला फिरून झाल्यावर गड उतरत असताना बुरुजाचा एक दगड निसटला आणि तो थेट अनिल याच्या डोक्यात येऊन पडला. दगड डोक्यात पडल्याने त्याच्या कानातून मोठा रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.