राज्याच्या राजकारणात खळबळ! हनीट्रॅप प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्याला अटक, तपास सुरू…

नाशिक : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणाऱ्या नाशिक हनीट्रॅप प्रकरणात भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ५ जुलै रोजी त्यांना अंधेरीतील ‘लोढा हाऊस’ येथून ताब्यात घेतले.
त्यांच्या विरोधात पॉक्सो, बलात्कार आणि हनीट्रॅप प्रकरणात गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. पोलिसांनी त्यांच्या जळगाव, जामनेर आणि पहूर येथील मालमत्तांवरही छापेमारी केली असून, अनेक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि नेत्यांच्या संलग्नतेची शक्यता व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट जळगावपर्यंत पोहोचले आहेत. जामनेरमधील रहिवासी असलेल्या प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये एक पॉक्सो कायद्यानुसार आहे आणि दुसरा बलात्कार व हनीट्रॅपशी संबंधित आहे.
या प्रकरणात आतापर्यंत ७२ उच्चपदस्थ अधिकारी आणि काही राजकीय नेते संशयाच्या भोवऱ्यात आहेत. विधानसभेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक पेन ड्राईव्ह दाखवत हे प्रकरण उघड केलं आणि प्रचंड राजकीय वादाला तोंड फुटलं. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आता या प्रकरणाचे धागेदोरे जळगावच्या राजकारणाशी जोडले जात आहेत.
प्रफुल्ल लोढा हे जामनेरचे रहिवासी असून, त्यांनी पूर्वी जळगावच्या एका प्रभावशाली नेत्याशी निकट संबंध ठेवले होते. नंतर मात्र त्यांनी त्याच नेत्यावर गंभीर आरोप केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मंत्री गिरीश महाजन यांचे हे पूर्वीचे विरोधक, आता मात्र कट्टर समर्थक बनले होते.
दरम्यान, या प्रकरणात जळगावमधील माजी राजकारणी आणि दोन वरिष्ठ अधिकारी संशयित म्हणून पुढे येत असून, नाशिकपासून जळगाव आणि मुंबईपर्यंतचा राजकीय आणि प्रशासनिक जाळं पोलिसांसमोर उलगडत आहे. पुढील काही दिवसांत आणखी मोठी नावं या प्रकरणात समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.