राज्याच्या राजकारणात खळबळ! मंत्र्यांच्या कार्यालयात लाच घेताना एकाला पकडलं, नेमकं घडलं काय?


मुंबई : महाराष्ट्रचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मोठी कारवाई केली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ही कारवाई पार पडली. एसीबीने संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर झिरवाळ यांच्या कार्यालयालाही सील करण्यात आले.

या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जातात, याचा तपास सध्या सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ३५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याची माहिती एसीबीला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला.

गुरुवारी ठरलेल्या वेळी पैसे स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर काही धक्कादायक नावे समोर आल्याची चर्चा आहे. मंत्र्यांचे खासगी सचिवही चौकशीच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.

मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात एसीबीने कारवाई करण्याची ही तिसरी वेळ मानली जात आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात राजेंद्र दर्डा यांच्या कार्यालयावर कारवाई झाली होती. तसेच भाजपचे नेते एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यकावर लाचखोरीप्रकरणी कारवाई झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!