दुर्दैवी! नाशिकमध्ये सहावीतील विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर हृदयविकाराने मृत्यू, घटनेने हळहळ..

नाशिक : हृदयविकाराच्या झटक्याने शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत ही दुर्देवी घटना घडली आहे.

श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
श्रेया फक्त ११ वर्षांची होती. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना श्रेयाला अचानक चक्कर आली आणि ती चालता चालता खाली पडली. ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी तात्काळ तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केलं.

डॉक्टरांनी श्रेयाला मृत घोषित केल्यानंतर शिक्षकांना देखील धक्का बसला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयाला हृदयाशी संबंधित आजार होता. यामुळेच तिला हा तीव्र हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे श्रेयाच्या कुटुंबावर आणि शाळेवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि आहारामुळे लहान मुलांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे, ही एक गंभीर आणि चिंतेची बाब आहे. पूर्वी हा आजार केवळ वृद्धांमध्ये दिसून येत होता, पण आता त्याचे वय कमी झाले आहे.
काही मुले हृदयातील रचनात्मक दोषांसह जन्माला येतात, ज्यामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हे दोष रक्ताभिसरण सामान्य होण्यापासून रोखतात आणि लहान वयातच हृदयविकाराचा धोका वाढवतात.
चुकीच्या खाण्याच्या सवयी, जंक फूडचे अति सेवन आणि मैदानी खेळांचा अभाव यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या समस्या निर्माण होतात, ज्यामुळे हृदयावर ताण येतो.