राहुरीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना! नराधमाचा चार सख्ख्या बहिणींवर अत्याचार…

अहिल्यानगर : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने एकाच कुटुंबातील चार बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.यात केवळ अल्पवयीन मुलीच नव्हे तर लग्न झालेली मोठी बहीणही वाचू शकली नाही. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी चारही बहिणींचं शारीरिक शोषण करत होता. धक्कादायक म्हणजे, हा नराधम त्यांचा लांबचा नातेवाईक असल्याचं तपासातून उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी एका दूरच्या नातलगाकडे सोपवण्यात आली होती. परंतु संरक्षण करण्याऐवजी याच व्यक्तीने त्यांचा विश्वासघात करत नराधमासारखं वर्तन केलं. आरोपीने चारही बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पातील कार्यकर्त्यांमुळे झाला. काही दिवसांपूर्वी लग्न झालेली मोठी मुलगी बहिणींना भेटायला आली असता आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पीडितेने धाडस करून हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला.
त्यानंतर दोघांनी स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला. संस्थेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर राहुरी पोलिसांनी वेगाने कारवाई करून चौघी बहिणींची सुटका केली आणि आरोपी दांपत्याला अटक केली.
पीडित मुलींपैकी एक सज्ञान असून उर्वरित तिघी अनुक्रमे १६, १४ आणि १० वर्षांच्या अल्पवयीन आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या मुलींवर वारंवार लैंगिक शोषण होत असल्याचं तपासात उघड झालं आहे. चार महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या मोठ्या मुलीवरही आरोपीने वारंवार अत्याचार केला होता. तिच्या धाडसामुळेच हे प्रकरण बाहेर आलं.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलींच्या देखरेखीची जबाबदारी घेतलेल्या नातलगानेच अत्याचार करणं ही अत्यंत संतापजनक बाब असल्याचं सामाजिक संस्थांकडून सांगितलं जात आहे. पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.