पुण्यात घडली धक्कादायक घटना! दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण..

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
आता पुन्हा पुण्याच्या बिबवेवाडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. बारमधील कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना काठी, दांडके आणि बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.२१) रात्री १२ वाजेच्या सुमारास पुण्यातील बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या एका बारमध्ये तीन तरुण दारू पिण्यासाठी गेले होते. दारूच्या नशेत असल्याने त्यांनी बारमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. बारचे नुकसान होईल, यासाठी बारमधील कर्मचाऱ्यांनी त्या तरुणांना तिथून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी कर्मचार्यांनी तरुणांना बेदम मारहाण केली. मारहाण करताना कर्मचाऱ्यांनी लाठ्या, काठ्या, दांडके तसेच धारधार शस्त्राचा वापर सुद्धा केला. या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.