राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी, नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.७)) चंद्रमा गार्डन येथे पार पडली. मात्र सभेदरम्यान एका तरुण सभासदाच्या वारंवार प्रश्नोत्तरांमुळे निर्माण झालेल्या वादातून दोन सभासदांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाली.

त्यामुळे बँकेच्या वार्षिक सभेला प्रथमच गालबोट लागले आहे. इतर सभासदांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला बाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

सभेत मांडलेले सर्व विषय शेवटी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी सभासदांकडून अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेले. त्याला अध्यक्ष सागर पाटोळे, संचालक किरण आहेर आणि सीईओ शांताराम वाकचौरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

सभेला बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, तसेच संचालक मंडळाचे सदस्य, तज्ञ संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले, तर उपाध्यक्षांनी आभार मानले.
दरम्यान, बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश ओसवाल यांची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून मिळालेल्या द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सभेतील वातावरण एकूण सकारात्मक असले तरी तरुण सभासदाच्या वादामुळे झालेल्या हाणामारीमुळे बँकेच्या वार्षिक सभेवर अनपेक्षित गालबोट लागले.
