विकासाचा मार्ग की अपघातांचा? समृद्धी महामार्गावर खासगी बस ट्रकला धडकली, २० जण गंभीर जखमी…

छत्रपती संभाजीनगर : सध्या राज्यात समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आता विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची घटना ताजी असताना समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरून जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील २० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे.
ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास छत्रपतीसंभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात घडली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खुराणा ट्रॅव्हल्सची खासगी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. बस छत्रपती संभाजीनगर शहरातील सावंगी परिसरात आली असता, लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसच्या कॅबिनचा चक्काचूर झाला.
सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील २० प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.