धक्कादायक! परीक्षेआधीच पुण्यात दहावीच्या ‘या’ विषयाचा पेपर फुटला; शिक्षण विभागात मोठी खळबळ…


पुणे : राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. एकीकडे नागपुरातील पेपर फुटीचं प्रकरण राज्यात गाजत असताना पुणे जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.

दहावीच्या गणित विषयाच्या भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही प्रश्नपत्रिका एका टेलिग्राम ग्रुपवर आधीच शेअर झाल्याचे आढळून आले. या घटनेमुळे मंडळाच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गणिताच्या दोन्ही पेपरच्या प्रती परीक्षेच्या वेळेपूर्वीच सोशल मीडिया ग्रुपवर पसरल्या होत्या. विशेष म्हणजे गणित भाग-२ ची प्रश्नपत्रिका तर परीक्षेच्या तब्बल तीन दिवस आधीच त्या ग्रुपवर टाकण्यात आली होती.

मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकांची मूळ पेपरशी तुलना केली असता त्या पूर्णपणे जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा पेपरफुटीचा प्रकार असल्याचे निश्चित झाले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पुणे विभागीय मंडळाने तातडीने कारवाई केली.

शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे संबंधित टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिनसह सदस्यांविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सायबर तज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

तांत्रिक तपासाद्वारे हा पेपर नेमका कोणत्या मार्गाने बाहेर आला आणि यामागे कोणत्या व्यक्ती किंवा गटाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकारामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

नागपूरमध्ये अलीकडेच पेपरफुटीचा प्रकार घडला असताना आता पुण्यातही अशी घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा अन्याय होऊ शकतो, अशी भावना व्यक्त होत असून शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!