खरातच्या काळ्या कारनाम्यात नव्या गुन्ह्याची भर! कांदा व्यापाऱ्याला तब्बल 85 लाखांचा गंडा, नाशिकमध्ये 12 वा गुन्हा दाखल

पुणे : भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांना आपल्या लैंगिक वासनेचा शिकार करणारा नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्याने धडाकाच लावला आहे. त्याच्या विरोधात आता नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे. एका कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीच आमिष दाखवून तब्बल 85 लाख रुपयांना गंडा घातल्याचं तपासात समोर आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर आठ गुन्हे लैंगिक शोषणाचे असून चार गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. खरातने संबंधित कांदा व्यापाराची 60 लाख रुपये किमतीची जागा वृद्धाश्रमाच्या नावे केवळ 22 लाख 25 हजार रुपयांच्या अल्प दरात खरेदी करून खरातने व्यापाराचा विश्वास संपादन केला. या बदल्यात एका चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याची आणि प्लॉट विक्रीच्या व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याच आमिष त्याला दाखवले. मात्र कोणतीही जागा दिली नाही.
संबंधित व्यापाऱ्याने खरातला पैशांचा किंवा जागेचा तगादा लावला, तेव्हा जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझे वाईट होईल, अशा शब्दांत शाप देत खरातने व्यापाऱ्याला घाबरवलं. मागील अनेक दिवसांपासून आरोपी अशाप्रकारे छळ करत होता. अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसात धाव घेतली त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

आता या नव्या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत पोलीस करत असून खरातच्या संपर्कात असलेले आणखी कोणी फसवणुकीचे बळी पडले आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.