एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार, आईसमोरच तडफडून जीव सोडला अन्…
कल्याण : कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची बुधवारी संध्याकाळी आपल्या आईसोबत घरी येत असताना एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर चाकूने सात-आठ वार करत तिच्या आईसमोर तिची हत्या केली. हत्येनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
आदित्य कांबळे असे या तरुणाचे नाव आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आदित्य कांबळे हा काही दिवसांपासून पाठलाग करीत होता. याबाबत मुलीने आईला माहिती दिली.
त्यानंतर ही मुलगी बाहेर पडताना आई देखील तिच्यासोबत जात असे. बुधवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही मुलगी शिकवणीवरुन आईसोबत घरी येत होती. जिना चढत असताना अचानक आदित्य तिच्या समोर आला.
तो तिथेच तिची वाट बघत थांबला होता. त्याला तिची घरी येण्याची वेळही माहिती होती. अल्पवयीन येताच त्याने तिच्यासोबत असलेल्या तिच्या आईला ढकलून दिलं आणि अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याने अल्पवयीन मुलीवर सात ते आठवेळा वार केले. आईने आपल्या मुलीला वाचवण्याता प्रयत्न केला, तेव्हा त्याने पुन्हा तिला ढकलून दिले.
आईचा आरडाओरड ऐकून सोसायटीतील लोक जमा झाले. तेव्हा आदित्यने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळताना त्याने फिनेलची बाटली काढली आणि फिनेल घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पण, तो पूर्ण फिनेल घेणार त्यापूर्वीच नागरिकांनी त्याला पकडलं. रक्तबंबाळ झालेल्या अल्पवयीन मुलीला तात्काळ केडीएमसी अंतर्गत रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आदित्य या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. काहीच दिवसांपूर्वी त्याने या मुलीला प्रपोज केलं होतं. पण, तिने नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून आदित्यने या मुलीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या केल्याचे समोर आलंय, याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आदित्य कांबळे विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरू केला.