धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी; अल्पवयीन मुलगा ताब्यात, हडपसर येथील घटना..
पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
ही घटना हडपसर परिसरातील काळेपडळ येथे घडली आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होता.
याप्रकरणी, पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने (वय. ३१) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलीला आरोपीने स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. तसेच तिला वारंवार फोन करुन आणि मेसेज करून तिची छळवणूक केली. तर तिचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला.
दरम्यान, याबाबत पीडित मुलीचे आई-वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे.