किरकोळ कारणावरून एकाच्या पोटात खुपसली कात्री, कुंजीरवाडी येथील धक्कादायक घटना…

लोणी काळभोर : शिव्या देवू नकोस असे सांगितल्याचा राग आल्याने एकाच्या पोटात कात्री खुपसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल ७७ च्या पाठीमागे घडली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला असून एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित दमोदर कुंजीर (वय ३६, रा. कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या पाठीमागे, ता. हवेली, जि-पुणे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मारुती गलांडे (रा. कुंजीरवाडी ता. हवेली, जि-पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अजित कुंजीर हे नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेताकडे चालले होते. त्या सामाईक रस्त्यावर मारुती गलांडे व त्याचे मित्र गप्पा मारत बसले होते. त्या सर्वांना पाहुन कुंजीर त्यांच्या जवळ गेले तेव्हा गलांडे हा त्यांना पाहून शिवीगाळ करून”तु सारखा सारखा इकडुन का येत आहेस, तुझ्यामुळे माझे हॉटेल बंद पडले. माझे मोठे नुकसान झाले” असे म्हणाला.

यांवर कुंजीर यांनी त्याला ‘तु मला शिव्या नको देवूस’ असे म्हणाले याचा राग आल्याने गलांडे याने गुलाबाचे रोप कट करण्याची कात्री कुंजीर यांच्या पोटात खुपसली. व विटेनी मारहाण केली. यांमुळे कुंजीर यांच्या पोटातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ कुंजीरवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.
याप्रकरणी अजित कुंजीर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारुती गलांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करीत आहेत.