एक जीव अन् प्रशासन धावले, तत्पर कारवाईतून वाचले जखमीचे प्राण, आरोपीही अटकेत…; बारामतीत नेमकं घडलं काय?

बारामती : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार समोर येत आहे.

अध्या अशीच एक धक्कादायक घटना बारामती येथून समोर आली आहे. बारामतीत हॉटेलच्या बिलावरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांडज (ता. बारामती) येथील महेंद्र धोंडिबा गायकवाड (वय. ५३) हॉटेल चालक यांनी याप्रकणी फिर्याद दिली आहेत.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २१ फेब्रुवारी रोजी रात्री हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी दुसऱ्याच दिवशी दुपारी मोरगाव रोडवरील ग्लोबल हॉटेलसमोर, प्रणव डिजिटल दुकानाशेजारील मैदानात त्यांच्यावर हल्ला केला. मुख्य आरोपी अक्षय जगताप व त्याच्या साथीदारांनी लाकडी दांड्याच्या कुऱ्हाडीने तसेच लोखंडी रॉडने गायकवाड यांच्या उजव्या पायावर व छातीत प्राणघातक वार केले.
हल्ल्यादरम्यान एका आरोपीने उपस्थित नागरिकांना धमकावत, “मध्ये आलात तर बघून घेऊ, असा इशारा दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जखमी गायकवाड यांना क्षणाचाही विलंब न लावता उपलब्ध वाहनातून बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांमुळे आणि पोलिसांच्या वेगवान निर्णयक्षमतेमुळे त्यांचे प्राण वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या गंभीर घटनेनंतर बारामती शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत संशयित आरोपी विक्रम जगताप (रा. खांडज) व जयदीप भागवत भोसले (रा. पाहुणेवाडी) यांना अल्पावधीत ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात संबंधित कलमान्वये कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी अक्षय सुनील जगताप (रा. माळेगाव कारखाना) व त्याचा साथीदार महादेव उर्फ भाऊ सुरेश जाधव (रा. ढवळेमळा) हे फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.