पुण्यातील वारजे परिसरातील न्यू अहिरे गावात शिरला बिबट्या ! अखेर 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पकडण्यात यश…!

पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्या मानवी वस्तीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे अवघड झालं आहे. मात्र, आता शहरी भागातही बिबट्या येऊ लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे यातच आता मानवी वस्तीचा भाग असलेल्या वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात शिरलेल्या बिबट्याला तब्बल 2 तासांच्याया अथक प्रयत्नानंतर बेशुद्ध करण्यात वन विभागाला यश आले आहे. या बिबट्याला आता राजीव गांधी प्राणी संग्रहालयात नेण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पुण्यातील एनडीए परिसराला लागून असलेल्या वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याचे सोमवारी सकाळी लक्षात आले. काही जणांना तो एका पत्र्याच्या शेडमध्ये जाताना दिसला.
दरम्यान , नागरिकांच्या लक्षात येताच ही बाब काही वेळातच सर्वत्र पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. बिबट्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अगोदर जाताना दिसला. तेथून तो वांजळे यांच्या गार्डनमध्ये गेला. त्यानंतर तो पुन्हा परत कडबा कुट्टी मशीनमधील एका वाहनाखाली बराच वेळ लपला होता. त्यानंतर मशीन जवळील एका गोदामात तो गेला. बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यु टीम, वारजे पोलीस घटनास्थळी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी मोठी जाळी गोदामाच्या दरवाजाच्या जवळ लावली. पण बिबट्याने तेथून पळ काढला.
त्यानंतर एका इमारतीच्या बाजूला असलेल्या झाडात तो दिसला. तेव्हा वन विभागाच्या पथकाने सकाळी सव्वा नऊ वाजता डॉट मारुन त्याला बेशुद्ध केले. बिबट्याला पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे पोलीस आणि रेस्क्यु टिमला ऑपरेशन करणे अवघड जात होते. सुदैवाने बिबट्याला पकडण्यात लवकर यश मिळाल्याने कोणावरही त्याने हल्ला केला नाही.