मुंबईत पहाटे भीषण दुर्घटना! डोंबिवलीत भीषण आग, पार्किंगमधीलमी २९ गाड्या जळून खाक, ५ जण होरपळले…

मुंबई : डोंबिवली पूर्व येथील सागाव परिसरात आज पहाटे एका निवासी इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत तब्बल २९ दुचाकी आणि काही सायकली जळून खाक झाल्या. ही आग विझवण्याच्या प्रयत्नात इमारतीमधील ५ रहिवासी जखमी झाले आहेत.

सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली. एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत तब्बल २९ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
सागाव येथील चेडा नगर, जय भारत स्कूलजवळ असलेल्या ‘राज अपार्टमेंट’ आणि ‘रविकिरण सोसायटी’ या जोड इमारतींच्या बेसमेंट पार्किंगमध्ये आज पहाटे ४:१५ च्या सुमारास अचानक आग लागली. ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी सर्व रहिवासी गाढ झोपेत होते.

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीने पेट घेतला आणि काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीचा भडका इतका मोठा होता की, पार्किंगमध्ये रांगेत लावलेल्या इतर दुचाकींनीही पेट घेतला. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.
धूर इमारतीच्या जिन्यांतून वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचल्याने रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आगीचे लोळ आणि धुरामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी लहान मुलांसह वृद्ध रहिवाशांनी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी गेलेले इमारतीमधील पाच रहिवासी यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.
आगीच्या झळा आणि धुरामुळे त्यांना त्रास झाला असून, तातडीने त्यांना स्थानिक ऑप्टिलाईट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत रहिवाशांच्या २९ दुचाकींचे सांगाडे उरले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.