पुणे पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल, अजित पवारांची मोठी घोषणा..

पुणे : आज पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा आनंदात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अनेक महत्वाच्या विषयांना हात घातला.

अजित पवार म्हणाले, गेल्या दीड वर्षांत पुणे पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी १ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आलेत. यामध्ये ७ नवीन पोलीस स्टेशन, ८१६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया, २८ नवीन कॅमेरे, घाट व टेकड्यांवरील सीसीटीव्ही सुरक्षा प्रकल्प, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत, अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज ५ व्हॅनचे लोकार्पण आदी बाबींचा समावेश आहे.

यासोबत लोणी काळभोर, नांदेड सिटी, खराडी व कोंढवा पोलीस स्टेशन इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे प्रकल्प साकार होत आहेत, ही बाब विशेष आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ५०३ जंक्शन्सवर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ बसवण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे.

या सर्व उपक्रमांमुळे पोलिसिंग अधिक सक्षम होईल, वाहतूक व्यवस्थापन सुलभ होईल, पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभ्या राहतील. सुरक्षित, आधुनिक आणि जागरूक पुणे घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असेही अजित पवार म्हणाले. तसेच अनेक कामे करायची असून यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे देखील ते म्हणाले.
