शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे!! शिरूरमध्ये शेतकरी महिलेने तहसील कार्यालयाकडे केली मागणी..

शिरूर : सध्या शिरूर तालुक्यातून एक बातमी समोर आली आहे. तालुक्यात लताबाई भास्कर हिंगे या शेतकरी महिलेची आगळीवेगळी मागणी केली आहे. यामुळे त्यांची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
महिलेला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे महिलेने चक्क हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्यांनी तहसील कार्यालयात रस्ता मागणीचा अर्ज केला होता. त्या अर्जावर तत्कालीन तहसीलदार यांनी एका तारखेची सुनावणी घेऊन स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते.
असे असताना मंडळ अधिकारी यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. शेतकरी लताबाई हिंगे यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या कार्यालामध्ये स्थळ पाहणी करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांना कोणीही भेटले नाहीत. यावेळी त्यांना मोठा मनःस्तापही सहन करावा लागला. नंतर अधिकाऱ्यांनी
लवकर स्थळ पाहणी करतो, मला सध्या वेळ नाही, मी नवीन बदली होऊन आलेलो आहे, अशी कारणे दिली.
हिंगे यांच्या शेतामध्ये पिक काढणीला आलेले असतानाही त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे तयार शेतमाल बाहेर काढायचा कसा असा प्रश्न त्यांना सतावतो आहे.
तसेच शेती हाच कुटुंबाचा एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे सर्वच काही ठप्प झाले. त्यामुळे नाईलाजाने शेतकरी लताबाई हिंगे शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.