धावत्या कारच्या डिक्कीतून हात लटकत होता, व्हिडीओ समोर आल्यावर उडाली खळबळ..


नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी ते सानपाडा दरम्यानच्या सेवा रस्त्यावर एका धावत्या इनोव्हा कारच्या डिक्कीतून हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे .

हात कुठल्या मृत शरीराचा किंवा एखाद्या व्यक्तीचा असून त्याचं अपहरण तर गेलं जात नसेल ना अशी शंका ही गाडी पाहणाऱ्याला आल्याशिवाय राहणार नाही. मात्र या कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यामागील सत्य समोर आले आहे.

सोमवारी वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रस्त्यावर एक इनोव्हा कार धावत होती आणि तिच्या डिक्कीतून एका व्यक्तीचा हात बाहेर लटकत होता. हा धक्कादायक प्रकार पाहून रस्त्यावरील इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काहींना गाडीत मृतदेह किंवा अपहरण केलेली व्यक्ती असल्याचा संशय आला.

याच दरम्यान एका सजग वाहनचालकाने आपल्या कारमधून या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या व्हिडिओची आणि तक्रारीची गंभीर दखल घेत तात्काळ तपासाला सुरुवात केली. व्हिडिओतील कारच्या नोंदणी क्रमांकावरून पोलिसांनी कार आणि तिच्या मालकाचा शोध घेतला.

दरम्यान, पोलिसांनी कार मालक आणि संबंधित तरुणांना शोधून काढल्यानंतर यामागील सत्य समोर आले. कारच्या डिक्कीतून लटकणारा हात हा मृतदेहाचा किंवा अपहरण झालेल्या व्यक्तीचा नव्हता. केवळ सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या उद्देशाने काही अतिउत्साही तरुणांनी हा धोकादायक आणि विचित्र प्रँक व्हिडिओ शूट केला होता.

पोलिसांनी रील बनवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी रील बनवण्यासाठी डिकीत बसलो आणि हात खाली लटकत ठेवला होता असं मुलांनी पोलिसांना सांगितलं. तसेच हा व्हिडीओ कसा शूट केला याचा बिहाइंड द सीन प्रकारचे व्हिडिओ देखील त्यांनी पोलिसांनी दाखवले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!