लोणी काळभोरमध्ये गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रा; ढोल-ताशांच्या गजरात रामदरा शिवालयाचा पारंपरिक सोहळा…

लोणी काळभोर : गुढीपाडव्याचे औचित्य साधून तिर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे वतीने ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तिर्थक्षेत्र रामदरा शिवालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आज रामदरा येथील सर्व मंदिरातील देवतांच्या सोन्याचांदीच्या दागिण्यांसमवेत रामदरा शिवालयाचे शिल्पकार स्वर्गीय १००८ श्री धुंदीबाबा व त्यांचे शिष्य मंगलपूरी महाराज यांच्या पादुकांची पारंपारिक पद्धतीने बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

यांवेळी धुंदीबाबा यांचे उत्तराधिकारी हेमंतपूरी महाराज उपस्थित होते. याप्रसंगी लोणी काळभोर येथील ग्रामस्थांनी ढोल लेझीम सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. ढोलाच्या तालावर अबालवृध्दांचा पडत असलेला पदन्यास पाहण्यासाठी लोणी काळभोर गावांतील नागरिकांनी गर्दी केली होती.
चौकाचौकांत या शोभायात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी रामनवमी साठी लागणा-या भंडा-याचे व इतर पूजा साहित्याची खरेदी करण्यात आली. तसेच आजपासून रामनवमी पर्यंत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हेमंतपूरी महाराज यांनी दिली.
