अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्राच्या लेकीचा मृत्यू, फ्लाइट क्रू रोशनीची भेट ठरली अखेरची..


अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी (ता.१२) एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यावेळी विमानात 242 प्रवासी होते. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातंच हे विमानत मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले.

त्यामुळे मोठी जीवित हानि झाली असून अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. या घटनेत महाराष्ट्राच्या डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या फ्लाइट क्रू सदस्येचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

लहानपणापासून एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रोशनीने तीव्र संघर्ष करून हे स्वप्न पूर्ण केले होते. मात्र, तिच्या आयुष्याचा प्रवास एका अपघातात थांबला आणि कालची तिची भेट तिच्या कुटुंबासाठी शेवटची ठरली.

दरम्यान, १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI171 या विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच नागरी वस्तीत कोसळत दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यात एअर क्रू म्हणून कार्यरत असलेली रोशनी सोनघरे हिचाही समावेश होता.

रोशनी सोनघरे ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथावरील नव उमीया कृपा सोसायटीत आई-वडील आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र सोनघरे आणि आई राजश्री यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. रोशनीचे शिक्षण मुंबईतच झाले होते आणि तिच्या जिद्दीच्या जोरावर तिने एअर होस्टेस म्हणून करिअर सुरू केले होते.

रोशनीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब खचून गेलं आहे. तिची आई दुःखात बुडाली आहे, तर वडील आणि भाऊ सध्या अहमदाबादला निघाले आहेत. तिच्या घराजवळ शोकाकुल वातावरण असून, शेकडो डोंबिवलीकरांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनीही घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनभेट घेतली.

तिचा भाऊ विघ्नेश एका खाजगी शिपिंग कंपनीत नोकरी करतो. गुरुवारी सकाळीच तिने आई-वडिलांचा निरोप घेतला होता. अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटसाठी ती ड्युटीवर निघाली होती. मात्र त्या फ्लाईटच्या अपघाताने तिचा जीवनप्रवास अर्धवट थांबवला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!