लाडकीच्या पैशावर अपात्र लाभार्थ्यांचा ‘डल्ला ‘; तब्बल 165 कोटी लाटले,मंत्री अदिती तटकरेंची कबुली

पुणे:गेल्या वर्षी मोठ्या दणक्यात सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेतून दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत. मात्र आता या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी सरकारने ई- केवायसी बंधनकारक केली आहे. आता या योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.या योजनेतून तब्बल १६५ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी उत्तरात कबुली दिली आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, १२ हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी रुपये तर ७७ हजार अपात्र महिलांनी १४० कोटी, तर ९५२६ शासकिय महिला कर्मचाऱ्यांनी १४.५० कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाटले आहे. यामध्ये पुरुषांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी महिलांचा समावेश आहे.आता शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार असल्याचंही अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे
दरम्यान प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांच बिनव्याजी कर्ज देण्याची मुख्यमंत्री यांची घोषणा कागदोपत्रीच असल्याचंही समोर आलं आहे. या योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र अद्यापही शासन निर्णय जारी केला नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे.

योजना सुरू करण्यात आली तेव्हा सरसकट महिलांनी अर्ज केले होते. सुरूवातील या योजनेसाठी अर्ज करताना आधार क्रमांक, बँक खाते आणि पात्रतेची माहिती तपासण्यासाठी तांत्रिक पडताळणी होती. मात्र काही जिल्ह्यांत डेटा व्हेरिफिकेशनमध्ये गंभीर त्रुटी निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे अपात्र महिलांनीही अर्ज करून लाभ घेतला अशी माहिती समोर आली आहे.

सिस्टममध्ये झालेल्या चुकांमुळे पुरुषांचे अर्जही मंजूर झाले. लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी असलेली तपासणी यंत्रणा तांत्रिक दृष्टीने चुकीची असल्याचे निकष समोर आले आहे. सरकारने हा सर्व प्रकार डिजिटल सिस्टममधील त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे घडल्याचे नमूद केले आहे. यामुळे आता यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
