महायुतीत वाद पेटला!! प्रभाग रचनेवरून भाजप-शिंदे गट आमने-सामने, नेमकं घडलं काय?

पालघर : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना प्रभाग रचनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्रालयातून दबाव टाकून प्रभाग रचनेत बेकायदेशीर बदल करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच अलका राजपूत यांनी केलेल्या आरोपानुसार, ५ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावून प्रभाग रचनेत बदल करण्यासाठी दबाव टाकला.

यानंतर ५ ऑगस्टच्या रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव थांबवून त्यात बेकायदेशीर बदल करण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ ऑगस्टला मंत्रालयात तो प्रस्ताव पाठवण्यात आला. या कारवाईत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचाही दावा राजपूत यांनी केला आहे.
दरम्यान, या बदलांमुळे सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनाही तोटा सहन करावा लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजपचे माजी नगरसेवकही नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा पातळीवरील गोटांमध्ये राजकीय खलबते सुरू असून, पालकमंत्री गणेश नाईक यांनी देखील जिल्हा प्रशासनाला जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रभाग रचना नियमानुसार झालेली असल्याचे सांगितले आहे. नागरिकांना आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या ३१ ऑगस्टपर्यंत नोंदवता येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार, पालघर नगर परिषद क्षेत्रातून एकूण ३० सदस्यांची निवड होणार आहे. शहराची लोकसंख्या ६८,९३० असून, यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या ३,४१९ आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या ९,७२० इतकी आहे.
प्रभाग रचनेनुसार नगर परिषदेत प्रत्येकी दोन सदस्य असलेले १५ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागासाठी सरासरी ४,५९५ लोकसंख्या गृहीत धरून ही रचना करण्यात आली आहे. २०११ च्या जनगणनेवर आधारित ही प्रभाग रचना असून, यावर नागरिकांना हरकती व सूचना मांडण्याची संधी उपलब्ध आहे.