धावत्या बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने सपासप वार ; प्रवासी गंभीर जखमी, हल्लेखोराची पोलीस चौकशी सुरू…

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच आता धावत्या एसटी बसमध्ये हल्लेखोराने एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बारामती-इंदापूर मार्गावर काटेवाडी येथे घडलेल्या या घटनेत अविनाश सगर नावाच्या व्यक्तीने एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.त्यानंतर हल्लेखोराने स्वतःवरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.
या अनपेक्षित घटनेमुळे बसमधील सर्व प्रवासी प्रचंड घाबरले आणि तात्काळ बस थांबवून त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हल्ला करणाऱ्या अविनाश सगरला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान याप्रकरणी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा अविनाश सगर मानसिक ताणतणावाखाली असून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
