जवळच्या नातेवाईकाने केला घात! व्यवसायाच्या नावाखाली कोट्यावधींची केली फसवणूक; लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…


लोणी काळभोर : जवळच्या नातेवाईकांनी पाण्याच्या बॉटलिंग प्लान्टमध्ये भागीदारी करून गुंतवणूक करण्यास भाग पाडून २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी व्यावसायिक आनंद मदनलाल लाहोटी (रा. हडपसर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रतिक राजेश काबरा, रोहित राजेश काबरा व राजेश सत्यनारायण काबरा (रा. युनिका सोसायटी, हडपसर) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की लाहोटी हे हडपसर परिसरात पेट्रोल पंप तसेच क्रीडा अकॅडमी चालवतात. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचे नातेवाईक प्रतिक काबरा यांनी “पाण्याच्या बॉटलिंग व्यवसायात ४० ते ५० टक्के नफा मिळतो” असे सांगून या व्यवसायात भागीदारी करा म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असे आमिष दाखवले. ते नातेवाईक असल्यामुळे विश्वास ठेवून लाहोटी यांनी डिसेंबर २०२४ पासून हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत को-पॅकेजिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला ३ लाख रुपये गुंतवले.

सुरुवातीला या व्यवसायातून नफा दिसल्याने प्रतिक काबरा व त्यांचे कुटुंबीय यांनी स्वतःचा प्लान्ट उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. “स्वतःचा प्लान्ट सुरू केल्यास पूर्ण नफा मिळेल,” असे सांगून त्यांनी लाहोटी यांना मोठ्या गुंतवणुकीसाठी तयार केले. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘ए.पी. बेव्हरेजेस’ या नावाने भागीदारी फर्म स्थापन करण्यात आली. त्यानुसार लाहोटी व प्रतिक काबरा हे ५०-५० टक्के भागीदार होते, तर राजेश व रोहित काबरा यांना वेतनावर प्लान्ट व्यवस्थापन व वाहतूक जबाबदारी देण्यात आली.

यानंतर प्लान्ट उभारणी, यंत्रसामग्री, कच्चा माल, परवाने आणि इतर खर्चासाठी फिर्यादी यांचेकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली गेली. वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे तसेच रोख स्वरूपात घेतलेल्या रकमेचा एकत्रित आकडा २ कोटी ३४ लाख २३ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान प्लान्टमधून रोज सुमारे ३ हजार बॉक्स पाण्याचे उत्पादन होत होते. या काळात जवळपास ६० लाख रुपयांचा व्यवसाय झाल्याचे लेखापालांच्या तपासात उघड झाले. मात्र भागीदारी फर्मच्या बँक खात्यात केवळ ५.१९ लाख रुपये जमा झाले होते, उर्वरित ५५ लाखांपेक्षा अधिक रक्कम आरोपींनी स्वतःच्या खात्यात घेतल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादी लाहोटी यांनी हिशोब मागितल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ सुरू झाली. अखेर नोव्हेंबर २०२५ मध्ये लाहोटी यांनी भागीदारी संपवून गुंतवणूक परत मागितली. त्यावेळी “मशिनरी विक्री करून पैसे देतो” असा बहाणा करण्यात आला. परंतु लाहोटी प्लान्टवर गेले असता सर्व यंत्रसामग्री गायब असल्याचे आढळले. चौकशी केली असता प्रतिक काबरा यांनी “मशिनरी ६० लाखांना विकली” असे सांगितले, परंतु त्या पैशांचाही हिशोब दिला नाही.

जानेवारी २०२६ मध्ये आरोपी मशीन विक्रीसाठी सोलापूर येथे आले असल्याची माहिती मिळाल्यावर लाहोटी तेथे गेले. दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला आणि ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पुढे कुरकुंभ येथे ट्रकमधील मशीन दुसऱ्या वाहनात हलवण्यात आल्याचा व्हिडिओही समोर आला. फिर्यादींच्या गुंतवणुकीतून खरेदी केलेली ब्लोइंग मशीन, फिलर, लेबलर, श्रिंक मशीन, कॉम्प्रेसर, आरओ प्लान्ट आदी उपकरणे परवानगीशिवाय विक्री केली आहे. याप्रकरणी आनंद लाहोटी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!